दीपक केसरकर म्हणाले, मी उद्धव ठाकरेंवर टीका...
मुंबई : शिवसेना-भाजप युती सरकारमधील शिवसेनेच्या नवनिर्वाचित मंत्र्यांनी आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळाला भेट देत शिवसेनाप्रमुखांना अभिवादन केले. यावेळी नवनिर्वाचित मंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केल्याचे चर्चिले जात होते. यावर दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे.
दीपक केसरकर म्हणाले, मी उद्धव ठाकरेंवर टीका केली अशी बातमी आली. पण, मी कधीच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली नाही आणि करणार नाही, हे आधीच म्हटलंय. संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला. तेव्हा सगळेच त्यात सहभागी होते. प्रबोधनकार ठाकरेही होते. बाळासाहेब यांच्याबद्दल बोलताना माझा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण केला, असे त्यांनी म्हटलं होतं. मी तेवढंच बोललो, उद्धव ठाकरेंवर ती टीका नव्हती, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होतेच. पण, त्या पलीकडेही ते होते. बाळासाहेबांवर प्रेमाचा हक्क सगळ्यांचा आहे. कोणताही गैरसमज झाला असेल तर ते मी दूर करतो. मी उध्दव ठाकरेंना लहानाचा मोठं होताना पाहिलं नाही. पण, काही काळ त्यांच्यासोबत मी होतो, त्यांच्यावर टीका होताना मी उत्तर दिलं. माझी स्वतःची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. प्रत्येक पक्षाची पार्श्वभूमी मी अनुभवली आहे. रेशीम बाग येथे जाणे कमीपणा नाही. मतभेद नाही. पण, चॉईस येतात. मी मुद्द्यांवर बोलतो, व्यक्तीवर नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, संजय राठोड यांना मंत्रीपद दिल्याने शिंदे सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. यावर बोलताना दीपक केसरकर म्हणाले, जोपर्यंत दोष आरोप सिद्ध होत नाही, तो पर्यंत आपण आरोपी म्हणत नाही. त्यांचा समाज शिष्टमंडळ राज्यात आलं होतं, त्यांनी बंजारा समाजावर अन्याय नकोय असं म्हटलं. कायदेशीर प्रक्रियेनुसार जेव्हा त्यावर तपासामधून उत्तर येईल तेव्हा मुख्यमंत्री अॅक्शन घेतील. पण, तोपर्यंत चित्र वाघ यांनी पाठपुरावा करावा, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावला आहे.