भारतीय रेल्वेच्या आधुनिक इतिहासात एकच नाव लिहिलं जाईल, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी- देवेंद्र फडणवीस
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच आता एका महिन्याच्या आतच पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा मुंबई दौऱ्यावर आले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दौरे होत असल्याची चर्चा राजकीय होत. आजच्या या दौऱ्यात मोदींनी विविध विकास कामांचं उद्घाटन केलं आहे. यावेळी त्यांनी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रेल्वेला हिरवा झेंडाही दाखवला आहे. या कार्यक्रमप्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
वंदे भारत एक्स्प्रेस ही स्वत:मध्ये एक चमत्कार आहे. अशा रेल्वेची कुणी कल्पनाही केली नव्हती. आता भारतात ही रेल्वे धावेल. यातील पहिली रेल्वे मुंबई ते साईनगरी शिर्डीपर्यंत साईबाबांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी धावेल. दुसरी रेल्वे मुंबई ते सोलापूर अशी सुरू करण्यात आली आहे. या ट्रेनमुळे आई तुळजा भवानी, सिद्धेश्वर, महाराष्ट्राची देवता विठ्ठल आणि स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद घेता येईल. ही रेल्वे महाराष्ट्रातील भाविकांसाठी आणि प्रवाशांसाठी मैलाचा दगड ठरेल. असे फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी महाराष्ट्राला १३ हजार कोटी रुपये दिले. आम्ही कधी याबाबत ऐकलं नव्हतं आणि विचारही केला नव्हता. महाराष्ट्रातील १२४ रेल्वे स्टेशन विकसित होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे तर एक आदर्श रेल्वे स्थानकाच्या रुपात विकसित होत आहे. भारतीय रेल्वेच्या आधुनिक इतिहासात एकच नाव लिहिलं जाईल, ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं असेल. अशा शब्दात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केलं.