अब्दुल सत्तार बोलले त्याचं मी समर्थन करणार नाही, ते चूकच- देवेंद्र फडणवीस
काल राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यभर सत्तारांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली होती. अब्दुल सत्तार यांनी माफी मागावी, तसंच त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. यावरच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "कोणीही महिलांबद्दल अपशब्द काढू नये. अब्दुल सत्तार बोलले त्याचं मी समर्थन करणार नाही, ते चूकच आहे," असे देवेंद्र फडणवीस मुंबईत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
"कोणीही महिलांबद्दल अपशब्द काढू नये. ते अतिशय चुकीचे आहे. आम्ही त्याचा विरोधच करु. हे आमच्याकडच्यांना लागू आहे तसे त्यांना देखील लागू आहे. आज मला त्यात जायचे नाही. मला असे वाटते राजकारणात आचारसंहिता पाळली पाहिजे. अब्दुल सत्तार बोलले त्याचं मी समर्थन करणार नाही. ते चूकच आहे. पण त्याचवेळी खोके, उलटसुलट बोलणे हे देखील चुकीचे आहे.
पुढे ते म्हणाले की, राजकारणाची ही पातळी महाराष्ट्रात असू नये असे मला वाटते. त्याकरता जोपर्यंत मोठे नेते आपापल्या लोकांना सांगत नाहीत तोपर्यंत हे शक्य होणार नाही. अन्यथा नेत्यांनी वेगळे बोलायचे आणि त्यांच्या लोकांनी बोलले की त्याचे समर्थन करावे. त्यामुळे सगळीकडच्या लोकांनी आचारसंहिता पाळली पाहिजे, असे मला वाटतं." असे मत देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना व्यक्त केलं.