Ulhas Bapat : निवडणूक आयोगाने चुकीचा निर्णय दिला तर...; उल्हास बापट काय म्हणाले?
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी जरी फेब्रुवारी महिन्यात होणार असली तरी आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज महत्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत शिवसेना तसेच धनुष्यबाण चिन्ह कोणाचं याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गट प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही सुनावणी महत्वाची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आधी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय द्यायला पाहिजे आणि नंतर निवडणूक आयोगाने निर्णय दिला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले आहे.
भारतात पार्टी सिस्टीमला खूप महत्व आहे. पक्षाला मान्यता किंवा चिन्ह देणं हे निवडणूक आयोगाचे काम आहे. चिन्ह देखील निवडणूक आयोगाच ठरवते. अनेकदा पक्षात फूट पडते. पण, पक्षाला मान्यता देणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे, असे न्यायालयानेही सांगितले आहे. परंतु, महाराष्ट्राचा विचार वेगळ्या रितीने करावा लागेल. लवकरात लवकर दोघांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देणं गरजेचे आहे, असे उल्हास बापट म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्याकडे संख्याबळ आहे. पण, संघटनात्मक नियंत्रण हा उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. आधी १६ जण अपात्र होते आहे का बघितलं पाहिजे. आधी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय द्यायला पाहिजे आणि नंतर निवडणूक आयोगाने निर्णय दिला पाहिजे. निवडणूक आयोगाने चुकीचा निर्णय दिला असं वाटल तर नंतर सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात, असेही उल्हास बापट यांनी म्हंटले आहे. तसेच, दुर्दैवाने भारतात राज्यपाल, स्पीकर यांच्यावर विश्वास नाही. यासाठी काही जणांचे मत आहे की घटना बदलली पाहिजे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासाठी ठाकरे गट व शिंदे गटात लढाई सुरु असून हा मुद्दा निवडणूक आयोगात आहे. परंतु, त्याआधीच उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपणार आहे. 23 जानेवारीला उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची पाच वर्षे पूर्ण होणार आहे. यामुळे शिवसेनेत चिंतेचे वातावरण पसरले आहे. यामुळे संघटनात्मक निवडणुकांसाठी शिवसेनेकडून निवडणूक आयोगाला विनंती करण्यात आली आहे. यावरही निवडणूक आयोग काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.