५० नव्हे तर १०० खोके द्यायला तयार..., सरकार पाडून दाखवा; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना आव्हान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सातारा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी आज कराड येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना जाहीर मेळाव्यात संबोधित केले. यावेळी वारंवार होणाऱ्या विरोधकांच्या टीकेला जोरदार उत्तर दिले आहे. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा असे म्हणत त्यांनी विरोधकांना ललकारले आहे.
आज कराड येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या जाहीर मेळाव्यात संबोधित केले. कराड शहरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी तात्काळ निधी मंजूर केला, कराड शहरातील विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही दिली.
पुढे ते म्हणाले की, विकासासाठी शिंदे सरकार ५० नव्हे तर १०० खोके द्यायलाही तयार आहे असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. हे सरकार पडेल असे वारंवार सांगितले जाते, हिंमत असेल तर हे सरकार पाडून दाखवा असे जाहीर आव्हान त्यांनी विरोधकांना दिले. हिंदुत्वाच्या विचारांशी सत्तेसाठी गद्दारी करणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात घडलेले मोठं-मोठे शिवसैनिक आज आपल्यासोबत आहेत. गजानन कीर्तिकर, रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ असे ज्येष्ठ नेत्यांनी आपल्यावर विश्वास टाकल्याचे सांगत, त्यांनी ठाकरे गटाला आत्मपरिक्षण करण्याचे, आत्मचिंतन करण्याचा सल्ला ही दिला.