राजकारणात मोठी घडामोड! अजित पवारांसह मंत्री शरद पवार यांच्या भेटीला
मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवारांच्या शपथविधीमुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले होते. याला काहीच दिवस झाले असता अजित पवार गट शरद पवारांच्या भेटीला पोहोचला आहे. यामध्ये अजित पवार यांचेही नाव सामील आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीमुळे बंडावर तोडगा निघतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पावसाळी अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या सर्व मंत्र्यांची आज बैठक पार पडली. यानंतर अजित पवारांसह मंत्री हसन मुश्रीफ, संजय बनसोडे, अदिती तटकरे, धनंजय मुंडे यांच्या समवेत अन्य मंत्री भेटीसाठी वाय. बी. सेंटर येथे दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी जयंत पाटील यांना फोन करुन तातडीने वाय. बी. सेंटरमध्ये येण्यास सांगितले आहे. तर, जयंत पाटील यांच्यासह जितेंद्र आव्हाड मविआच्या बैठकीतून तातडीनं वाय बी चव्हाण सेंटरच्या दिशेने रवाना झाले आहेत.
दरम्यान, अजित पवार गट बंडानंतर पहिल्यांदाच शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. विशेष म्हणजे उद्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वीच हे नेते शरद पवार यांना भेटायला गेल्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्यात काय चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यापूर्वीही अजित पवार यांनी प्रतिभा पवार यांच्या आजारपणाच्या कारणाने सिल्वर ओक या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली होती.