शीतल म्हात्रे मॉर्फ व्हिडीओ प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय पोलिसांच्या ताब्यात
मुंबई : शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मॉर्फ करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे या व्हिडिओवरून सध्या राजकारण चांगलंच तापल्याचे दिसून येत आहे. याचे पडसाद विधीमंडळातही उमटलेले दिसून आले. याप्रकरणी आता पोलिसांनी साईनाथ दुर्गे यांनी ताब्यात घेतले आहे. साईनाथ दुर्गे हे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात.
शिवसेनेची सध्या आशीर्वाद यात्रा सुरू आहे. या यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार प्रकाश सुर्वे, उपनेत्या शितल म्हात्रे या सहभागी झाल्या होत्या. या यात्रेदरम्यानचा एक व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने मॉर्फ करुन व्हायरल करण्यात आला आहे. याप्रकरणी शितल म्हात्रे व प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी विमानतळावरून साईनाथ दुर्गे यांना ताब्यात घेतले आहे.
कोण आहेत साईनाथ दुर्गे?
साईनाथ दुर्गे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते माजी बीएमसी शिक्षण समिती सदस्य आहेत. सध्या युवासेना कोअर कमिटी सदस्य असून छत्रपती शिवाजी महाराज उद्यान कला महोत्सव - आयोजक आहेत. त्यांच्या अटकेमुळे ठाकरे गटात खळबळ माजली आहे.
दरम्यान, व्हायरल व्हिडीओवर शीतल म्हात्रे यांनी संताप व्यक्त करत पत्रकार परिषदेत बाजू मांडली. स्त्री म्हणून आज वेदना होत आहे. बोलण्यासारखं काहीही नसलं की चारित्र्यावर बोललं जातं. हा व्हिडिओ ठाकरे गटाच्या अनेक फेसबुक पेजवरुन शेअर करण्यात आला. या व्हायरल व्हिडिओ संदर्भात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी 1 अंधेरीतील पदाधिकारी आणि दुसरा दहीसरमधील कार्यकर्ता आहे. तसेच या सर्व प्रकारामागील मास्टरमाईंड कोण आहे, तो शोधून काढावा, असे शीतल म्हात्रे यांनी म्हंटले होते.