हा प्रश्न केवळ खासदारापुरता नाही, तर...: आदित्य ठाकरे
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. सुरत न्यायालयाने गुरुवारी राहुल गांधींना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवत त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. यानंतर ही कारवाई करण्यात आली. याविरोधात कॉंग्रेस आक्रमक झाली असून देशभरात आंदोलन करणार आहेत. यावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सामान्य नागरिकांच्या देखील प्रतिक्रिया आता उमटायला लागल्या आहेत. आम्ही सतत सांगत आलो आहोत की लोकशाही धोक्यात आहे. हे सिद्ध करणारे आजचं पाऊल आहे. ज्यांच्या मनात भीती असते आणि ज्यांना आवाज ऐकायचा नसतो. ते असा प्रकार घडवून आणतात. ही कारवाई इतकेच दाखवत आहे की आपल्या देशातील लोकशाही संपत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
सत्यासाठी लढताना माफी कोणाची आणि कशासाठी मागायची? जर माफी मागायची आहे तर मग हे सगळं नाट्य का घडवून आणलं? हे सगळं एक षडयंत्र घडवून आणलेला आहे, असा आरोप करत आदित्य ठाकरे म्हणाले, आज आम्ही रस्त्यावरती आलो आहोत कारण का हा प्रश्न केवळ खासदारापुरता नाही. तर मग देशातील लोकशाहीसाठी आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकातील कोलार येथील सभेत राहुल गांधी म्हणाले होते की, सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? या संदर्भात भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाची प्रतिष्ठा खाली आणल्याचा त्यांचा आरोप होता. याप्रकरणी अखेर सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यामध्ये न्यायालयाने राहुल गांधी यांना जामीनही मंजूर केला होता.