आजोबासुद्धा विचार करतील, काय हे गद्दार लोक...; आदित्य ठाकरेंची जोरदार टीका
औरंगाबाद : विधिमंडळात लावण्यात येणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. तैलचित्राच्या अनावरण कार्यक्रम पत्रिकेत ठाकरे कुटुंबियांचे नाव नसल्याने शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. यावरुन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. ते औरंगाबादेत बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, गद्दारी होऊन गेल्यानंतर आणि सरकार पडल्यानंतर मी येतच असतो. इथून मला प्रेरणा मिळते. राज्य ओके नाही पण ते ओके होऊन बसले. कुणी 50 खोके घेतले तर कुणी 9 लायसन्स घेतले आहेत. तैलचित्र लावणार आहेत, तैलचित्राचे जे अनावरण होणार आहे. ते माझे आजोबा सुद्धा विचार करत असतील काय हे गद्दार लोक माझ्या तैलचित्राचं अनावरण करतात, अशी जोरदार टीका त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.
एका माणसाच्या राक्षसी महत्वकांक्षांमुळे महाराष्ट्र मागे चालले आहे. दाओसला जाऊन बोगस कंपन्या आणल्या आहेत. आज क्रिकेट खेळत आहे, उद्या वर्ल्ड कप जिंकायचा आहे त्यासाठी तयार राहा, अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या आहेत.
जे गेले त्यांना डिसक्वालिफाय व्हायचं आहे. कायद्यामध्ये त्यांना वाचवण्यासाठी कुठलीही प्रोव्हिजन नाही. गद्दारी जी आहे त्याची अँटीडिफेक्शन लॉमध्ये डिस्कालिफिकेशन होतं. आज नाहीतर उद्या होणारच. न्याय हा मिळणारच आहे. जे गद्दार झाले त्यांना व्हिआरएस घ्यायला लावला आहे, त्यांना कुठल्याही सीट मिळणार नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हंटले आहे.
तसेच, शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील होत असलेल्या घडामोडी पाहता जेवढी ताकद वाढेल. महाराष्ट्रासाठी आवाज वाढवण्यासाठी सर्व समाजाने एकत्र येणे महत्वाचं ठरलं, अशीही सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.