राजीनामा देईन वरळीत काय ठाण्यात देखील लढेन : आदित्य ठाकरे
नाशिक : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा आव्हान दिले आहे. मी राजीनामा देईन वरळीत काय ठाण्यात देखील लढेन. माझ्या मागे कोणती महाशक्ती नाही तर हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आहेत, असे त्यांनी म्हंटले आहे.
मी परवा म्हटल राजीनामा द्या आणि वरळीत लढवून दाखवा. चला मी राजीनामा देईन वरळीत काय ठाण्यात देखील लढेन. समोरून आव्हान दिलं असताना सोशल मीडियावरून आयटी सेलकडून टार्गेट केलं जातंय. सगळे गद्दार माझे अंगावर येत आहेत पण माझे शिवसैनिक सांभाळून घेत आहेत. माझ्या मागे कोणती महाशक्ती नाही तर हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आहेत. जे गद्दार गेलेत ते माझे आजोबा चोरायला बघतात. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो चोरून पोस्टरवर लावत आहेत, असा टोला आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला लगावला आहे.
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये मी भाषण द्यायला आलेलो नाही. इथे मी प्रेरणा घ्यायला आलोय. एका पक्षाला ताकद दाखवणं हे मी शिकायला आलोय. गट वगैरे काही नाही. शिवसेना एकच आहे. निकाल येईलच. न्याय नीट झाला तर कळेलच.
तर, पत्रकार जे सर्व्हे करत आहेत. यात महाविकास आघाडी गरुड झेप घेत आहे. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांना भेटलो. तेव्हा त्यांनी विचारलं की सरकार गेल्यावर देखील महाविकास आघाडी एकसंघ कशी? आम्ही सरकारमध्ये असताना जनतेसाठी काम केले, त्याचं चित्र आम्हाला दिसत आहे.
गद्दार सरकार दिल्लीला पळतात. सामान्य जनतेसाठी जात नाहीत. विधानसभेत देखील हे 50 खोकेवाले घाबरतात. या सरकारला लाज वाटत नाही, कितीही नाव ठेवली तरी. गद्दार गटातले आम्हाला सांगतात की मतदारसंघात फिरायला कठीण झालंय. मंत्री झाल्यावर त्यांचे जिल्हे असतात. पण, माझा आणि उद्धव ठाकरे आमचा जिल्हा नाही, आमचा सगळा महाराष्ट्र आहे, असेही आदित्य ठाकरेंनी म्हंटले आहे.