साहेब निर्णय मागे घ्या; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपोषणावर
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' च्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. या भाषणादरम्यान शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. परंतु, हा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही. यामुळे अनेक कार्यकर्ते भावूक झाले असून शरद पवारांना घोषणा मागे घेण्याचे मागणी करत आहेत. तर, शरद पवारांनी निर्णय मागे घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी उपोषण आंदोलन सुरु केले आहे.
राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णयांची शरद पवारांनी आज घोषणा केली आहे. यामुळे सभागृहात एकच गोंधळ निर्माण झाला असून महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात येत आहे. तर, कार्यकर्ते आणि नेत्यांनी थेट स्टेजवरुन चढून शरद पवार आणि प्रतिभा पवार यांना निर्णय मागे घेण्यासाठी साकडे घातलं आहे. साहेब निर्णय मागे घ्या, सभागृह सोडणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्ते सभागृहाबाहेर थेट उपोषणावर बसले आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांनीही कार्यकर्त्यांशी संवाद साधत चर्चेचे आवाहन केले. मात्र, कार्यकर्ते कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नसून जोरदार घोषणाबाजी करत आहेत.