LOKशाही मराठी सहकार उद्योग संवाद'चे मुंबईत आयोजन; शरद पवारांसह दिग्गजांची उपस्थिती
मुंबई : सहकार आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार, १५ ऑक्टोबर रोजी मुंबईत 'लोकशाही सहकार उद्योग संवाद' या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी
मान्यवरांच्या उपस्थितीत सहकार आणि उद्योग क्षेत्राविषयी विचारमंथन केले जाईल. या कार्यक्रमासाठी केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर आदी मान्यवर उपस्थित राहतील. लोकशाहीचे मुख्य संपादक कमलेश सुतार या मान्यवरांसोबत संवाद साधतील.
जनतेच्या मनातील नंबर १ चॅनल असलेल्या लोकशाही मराठी तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून यंदा सहकार आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गजांशी संवाद आणि सन्मान समारंभ मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे विद्याधर अनास्कर, राजस्थान बँकेचे सूरज बियाणी, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे, पीपीसीबी बँकेचे अध्यक्ष एस. व्ही. मोहिते उपस्थित राहतील.
दिवसभर होणाऱ्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता शरद पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने होणार असून त्यानंतर लोकशाही मराठीचे संपादक कमलेश सुतार हे शरद पवार यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता या कार्यक्रमाची सांगता सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मुलाखतीने होईल.