महाराष्ट्र
‘बिपरजॉय’ चक्रीवादळ! हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
मुंबई : अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ तयार होत असून याचा परिणाम राज्यावरही काही प्रमाणात होणार आहे. यामुळे राज्यांच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. याशिवाय केरळात धडकणाऱ्या मान्सूनवरही याचा परिणाम होणार आहे.
बिपरजॉय चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवर परिणाम जाणवणार नसला तरी हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यांच्या अनेक जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि औरंगाबादमध्ये पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. वाऱ्याचा वेगही ताशी ३० ते ४० किलोमीटर प्रमाणे असण्याची शक्यता आहे. पुढील तीन ते चार तास घराबाहेर पडतांना काळजी घेण्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.