Maharashtra School | राज्यातील शाळा 'या' तारखेपासून होणार सुरु, शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्रातील (Maharashtra School) शाळांची उन्हाळी सुट्ट्या लवकरच संपणार आहे. कारण आता शाळा सुरू होण्याची तारीख शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. यानुसार राज्यातील शाळा १३ जूनपासून सुरू होणार आहेत. शाळा (School) सुरू होण्याच्या तारखेची घोषणा होण्यासह राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने २०२२ -२३ या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रकही घोषित केले आहे.
शालेय शिक्षण विभागाने याबाबत एक परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार, या वर्षी शाळा २३७ दिवस सुरू राहणार आहेत. शाळेचे पहिले सत्र आॅक्टोबरपर्यंत असणार आहे. तर दुसरे सत्र ९ नोव्हेंबरला सुरू होणार आहे. सुट्ट्यांच्या बाबतीत मात्र यंदा शिक्षक आणि विद्यार्थ्यांची चंगळ असणार आहे. या वर्षी २० अतिरिक्त सार्वजनिक सुट्ट्या मिळणार आहेत. तसेच दिवाळीच्या २६, उन्हाळ्यामध्ये ३६ आणि अतिरिक्त ४ अशा ७६ मिळणार आहेत. यामध्ये रविवारच्या ५२ सुट्ट्यांचा समावेश केलेला नाही. म्हणजे यंदा शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकूण १२८ सुट्ट्या मिळणार आहेत.
शाळांचे वार्षिक वेळापत्रक मार्च २०२० पासूनच्या कोरोना लाॅकडाऊनपासून बिघडले आहे. मागील वर्षीच्या जूनपासून शाळा आॅनलाईन सुरू झाल्या. त्यानंतर आॅक्टोबरपासून आॅफलाईन शाळा सुरू झाल्या. यंदा शाळा सुरळीत सुरू राहतील अशी अपेक्षा आहे. मुलेही युनिफाॅर्मध्ये दिसतील आणि तासही नियमीत सुरू होतील. यंदाच्या शैक्षणिक वर्षात आठड्यातील तासांची संख्या ४५ वरून ४८ करण्यात आली आहे.