Sanjay Raut : "शिवसेनेत महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणारी औलाद निर्माण होणार नाही"
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे कालपासून (21 जून) ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे नेमके कुठे आहेत यासंदर्भातील ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबईत यासंदर्भात माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
“विधान परिषदेच्या निकालानंतर काही आमदारांचा संपर्क होत नाहीये हे सत्य आहे. काही आमदार मुंबईत नाहीत. पण आज सकाळपासून काही आमदारांचा संपर्क झालेला आहे. तसेच एकनाथ शिंदे बाहेर असून त्यांच्यासोबत संपर्क झालेला आहे. त्याच्यासोबत ज्या क्षणी संपर्क होईल ते परत येतील. एकनाथ शिंदे कालपर्यंत आमच्यासोबत होते. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून यावेत यासाठी ते प्रयत्न करत होते. एकनाथ शिंदे जीवाभावाचे सहकारी आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत जोपर्यंत बोलणे होत नाही तोपर्यंत त्यांच्याबाबत कोणतेही विधान करणार नाही,” असे राऊत यांनी सांगितले.
शिवसेना ही निष्ठावंताची सेना आहे. सत्तेसाठी आणि पदासाठी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणारी औलाद ही कधी शिवसेनेत निर्माण होणार नाही. जे निर्माण झाले आणि बाहेर पडले त्यांची अवस्था आपण पाहत आहात. ज्यांची नावे माध्यमातून पाहत आहे त्यातले बरेचशे आमदार वर्षा बंगल्यावर आहेत. काही मंत्र्यांशी संपर्क झाल्यावर त्यांनी आम्हाला इथे आणण्यात आल्याचे सांगितले आहे. ते आमदार गुजरात आणि सुरतमध्ये आहेत. त्यांची व्यवस्था गुजरात भाजपाचे अध्यक्ष करत आहे,” असे संजय राऊत म्हणाले.