केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज ठाकरेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या कालच्या भाषणामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री आणि भाजपनेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे राज ठाकरे यांच्या घरी त्यांच्या भेटीसाठी गेले आहेत. त्यामुळे आता राज्यात नेमक्या काय राजकीय घडामोडी घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
राज ठाकरे यांनी काल शिवाजी पार्कवरून हिंदुत्वाच्या मुद्दयावरून केलेलं भाषण आज दिवसभरातील राजकीय वर्तुळातील चर्चेचं कारण ठरलं आहे. राष्ट्रवादी आणि विशेषत: शरद पवारांवर केलेल्या टीकेमुळे महाविकास आघाडीने राज ठाकरेंच्या भाषणावर टीका केली आहे. त्यामुळे या सर्व घडामोडी घडत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ही भेट महत्वाची मानली जातेय.
दरम्यान, राज ठाकरेंच्या भूमिकेचं भाजपने स्वागत केलं आहे. मशिदीवरील भोंग्या संदर्भातील राज ठाकरे यांच्या भूमिकेचं आपण स्वागत करतो असं विनय सहस्त्रबुद्धे यांनी म्हटलं आहे. तसंच मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात राज ठाकरे यांनी केलेल्या विधानाबाबत बोलताना ते म्हणाले की, खऱ्या अर्थाने सलोखा आणि सामंजस्याने नांदायाचं असेल तर कुणालाही विशेष अधिकार देता कामा नये, या अर्थाने त्यांच्या या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे असं सहस्त्रबुद्धे म्हणाले.