“कोण अजित पवार? मी ओळखत नाही, भास्कर जाधव नाचे;” नितेश राणे प्रकरणावर नारायण राणेंची खोचक प्रतिक्रिया
आमदार नितेश राणे यांच्यावर सुरू असलेल्या अटकेच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. अजित पवारांना ओळखत नाही, भास्कर जाधव नाचे, प्रभूंची औकात काय? असा तुफान हल्ला नारायण राणे यांनी चढवला. आदित्य ठाकरे आणि मांजरीचा संबंध काय असा सवालच राणे यांनी केला.
भाजपा आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आदित्य ठाकरेंकडे बघत म्याव म्याव असा मांजरीचा आवाज काढल्यानंतर त्यावरून राज्यातलं राजकारण तापू लागलं आहे. विधानभवन परिसरात अशा प्रकारे आमदारांनी वर्तन करू नये, आपण कुत्री, मांजरींचं प्रतिनिधित्व करत नाही हे लक्षात ठेवावं, असा सूचक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितेश राणेंना लगावल्यानंतर त्यावर नितेश राणेंचं वडील आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अजि पवारांनी आज विधानसभेत बोलताना मांडलेल्या भूमिकेवर देखील त्यांनी टीका केली आहे.
"विधिमंडळात नितेशनं म्याँव म्याँव केलेलं नाही. तो काही असंसदीय शब्द नाही. मग तुमची काय हरकत आहे. मांजराचा आवाज कोण काढतं की ज्यामुळे संताप झाला? आदित्य ठाकरेंचा आणि मांजराचा संबंध आहे का? वाघाची मांजर कधी झाली? त्याच वेळी कुणी अजून कसला आवाज काढला असता, तर ते तसेच आहेत का? मांजरीचा आवाज काढला म्हणून राग का यावा?" असा सवाल नारायण राणेंनी कणकवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला
अजित पवारांना प्रतिप्रश्न
दरम्यान, यावेळी पत्रकारांनी अजित पवारांनी विधानसभेत मांडलेल्या भूमिकेविषयी विचारणा केली असता नारायण राणेंनी त्यावर निशाणा साधला. "कोण अजित पवार? मी ओळखत नाही अजित पवारांना. राज्यातल्या लोकांच्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे, त्यांच्याबाबत संदर्भ का देत नाहीत तुम्ही?" असा उलट प्रश्न त्यांनी अजित पवारांना केला.
भास्कर जाधव तर नाचे, राणेंचा जोरदार हल्ला
पंतप्रधानांवर कोण बोललं तर ऐकून घेणार नाही, नक्कल केली तर सेम उत्तर देऊ, आमच्यातही नकलाकार आहेत, असे नारायण राणे यांनी ठणकावले. भास्कर जाधव हे नाचे असल्याची टीका त्यांनी केली.