विधानसभा अध्यक्ष : भाजपकडून नार्वेकर, तर मविआकडून साळवींना उमेदवारी
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री ( CM Eknath Shinde ) आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री ( DCM Devendra Fadnavis ) पदाची शपथ घेतली आहे. त्यातच आता मंत्रिमंडळ विस्तार आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यासाठी भाजपकडून युवा आमदार राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला ( Rahul Narvekar Filed Application Assembly Speaker ) आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला अर्ज दाखल केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यानंतर होत असलेल्या या निवडणुकीत दोन्ही बाजूच्या उमेदवारांची नावे घोषित झाल्याने चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांचं नाव घोषित केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यातच आता विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांनी अर्ज दाखल केल्याने आणखी धक्का भाजपने दिला आहे. दरम्यान, भाजप आणि शिंदे गटाने गुरुवारी सत्तास्थापनेचा दावा केला होता. त्यासाठी त्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. यासाठी विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. याचदरम्यान भाजपने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनेक ज्येष्ठ आमदारांचा पत्ता कट करत मुंबईतील आमदार राहुल नार्वेकर यांना संधी दिली आहे.
आम्हाला १७० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जात आहे. असं असतानाही महाविकास आघाडीने पुन्हा एकदा आपली प्रतिष्ठा पणाला लावत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
'या' दिवशी होणार अधिवेशन - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नवनियुक्त सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी अधिवेशन बोलवले आहे. शनिवारी आणि रविवारी अर्थात 2 व 3 जुलैला हे अधिवेशन होणार होते. मात्र, आता 3 आणि 4 जुलै म्हणजेच रविवार आणि सोमवार अशा दोन दिवसांत हे अधिवेशन पार पडणार आहे.