महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय..., एकनाथ शिंदे यांचं नवं ट्विट
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी फेसुबक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. तुम्हाला मी मुख्यमंत्रिपदी नको आहे का? असा थेट सवाल विचारत मुख्यमंत्र्यांनी कळीच्या मुद्द्याला हात घातला. यावेळी एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर भाष्य करताना त्यांनी शिंदेंचा नामोल्लेख टाळला. याचदरम्यान आता एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा सुचक ट्विट केले आहे.
या ट्विटमध्ये एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे आहे असं म्हटले आहे. तसेच गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि यामध्ये शिवसैनिक भरडला गेला आहे. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे - शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक आहे. म्हणून आता महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे.