आमदार रत्नाकर गुट्टे अडचणीत; ईडीकडून २५५ कोटी रुपयांची मालमत्ता ताब्यात

आमदार रत्नाकर गुट्टे अडचणीत; ईडीकडून २५५ कोटी रुपयांची मालमत्ता ताब्यात

Published by :
Published on

ईडीने राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांची जप्त केलेली मालमत्ता ताब्यात घेतली आहे. ही मालमत्ता यापूर्वी डिसेंबर २०२० मध्ये गुट्टे यांच्याविरोधात नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात ईडीने जप्त केली होती. ताब्यात घेतलेल्या मालमत्तेची किंमत सुमारे २५५ कोटी रुपये आहे.

गुट्टे यांच्यावर ईडीने ६३५ कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. यामध्ये त्यांनी विविध गरीब शेतकऱ्यांच्या नावे बँकांकडून घेतलेल्या कर्जाची फसवणूक केली होती. घेतलेले कर्ज एका योजनेंतर्गत होते. ज्यामध्ये बँकांनी ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीसाठी उपकरणे, बियाणे, खते, ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी कर्ज दिले होते.

गुट्टे यांनी इतर काही जणांसोबत मिळून शेतकऱ्यांच्या कागदपत्रांचा वापर करून गंगाखेड शुगर या त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढले आणि तब्बल ६३५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. बँकांकडून घेतलेली कर्जे २०१२-१३ आणि २०१६-१७ दरम्यान होती. ही कर्जे वितरीत झाल्यानंतर गंगाखेड शुगरद्वारे इतर विविध खात्यांमध्ये वळती करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज काढले होते, त्यांना कधीच ते कर्ज मिळाले नाहीत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com