नागपूर विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस-भाजपा आमने-सामने; नाना पटोले म्हणाले…
राज्यातल्या ६ विधानपरिषद जागांसाठी निवडणूक नियोजित आहे. यामध्ये कोल्हापूर, धुळे-नंदुरबार आणि मुंबईतल्या दोन जागांवर बिनविरोध निवडणूक होणार आहे. पण नागपूरमध्ये मात्र काँग्रेस आणि भाजपा यांच्यामध्ये थेट सामना होणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीवरही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केलं.
नंदूरबारची जागा भाजपला गेली आहे. कोल्हापूरची जागा काँग्रेसला आली आहे. तसेच मुंबईतील दोन जागांपैकी एक जागा शिवसेना आणि दुसरी भाजपला मिळाली आहे. मात्र, नागपूरमध्ये लढत होणार आहे. त्याची सुरुवात झाली आहे. त्यात काँग्रेसचा विजय होणार हे निश्चित आहे, असं त्यांनी सांगितलं. आज अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया संपली. कुणी अर्ज मागे घेतले आणि कुणी नाही घेतले हे स्पष्ट होणार आहे. आमचे उमेदवार छोटू भोयर विजयी होतील हा आमचा विश्वास आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
नागपूरची निवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपकडून आमच्याकडे प्रस्ताव आला नाही. त्यामुळे नागपूरच्या जागेबाबत कोणताही निर्णय झाला नाही. त्यांच्याकडून प्रस्ताव आलाच नाही. त्यामुळे आता त्यावर अधिक भाष्य करणं योग्य होणार नाही, असं त्यांनी सांगितलं. जागा कुणाकडे अधिक आहेत. नंबर कुणाकडे आहेत याला या निवडणुकीत काही अर्थ नाही, असंही ते म्हणाले. भाजप नगरसेवक नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे भाजप घाबरली असल्याचं दिसतं. आम्हाला आमच्या नगरसेवकांना अज्ञातस्थळी नेण्याची गरज नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं