मविआ सरकारची दोन वर्षे; चंद्रकांत पाटील म्हणाले…
राज्यातील महाविकासआघाडी सरकार आज आपल्या कार्यकाळाची दोन वर्षे पूर्ण करत आहे. या पार्श्वभूमीवर आज(रविवार) भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारपरिषद घेत महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली. चंद्रकांत पाटील म्हणाले, "दोन वर्षात महाराष्ट्राची झालेली अधोगती सर्वसामान्यांवर झालेला अन्याय, सर्वसमान्यामाणसाची झालेली फरपट याबाबत आतापर्यंत पत्रकार परिषदांमधून मांडणी करताना, अनेक मुद्दे आलेले आहेत. पण आज सरकारला बरोबर दोन वर्षे पूर्ण होत आहेत., ते पूर्ण होत असताना काही मुद्दे मी अधोरेखित करणार आहे.
प्रामुख्याने दोन वर्षांच्या कालावधीत बाकी विकासाचं काम काही झालंच नाही. रस्त्याची कामं पडून आहेत, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही, शेतकऱ्यांची कर्जामाफी थांबलेली आहे हे सर्व सुरूच आहे. एक धंदा जोरात चालला. तो म्हणजे मोठ्याप्रमाणावर पैसे कमवा. हे आम्ही विरोधी पक्ष म्हणून बोलतोय असं नाही. तर, वेगवेगळ्या स्तरावरचे अधिकारी, पोलीस दलातील अधिकारी या प्रकारचे आरोप करत आहेत आणि त्यातून दोन वर्षात न चुकता झाला तो भ्रष्टाचार, प्रशासनामधील अनियमितता. अशी स्थिती आज महाराष्ट्राची झालेली आहे की, व्यवस्थापन हे संपूर्णपणे कोलमडलेलं आहे."