Mumbai Local : CSMT स्थानकात लोकल बफरला धडकली, हार्बर मार्गावरील लोकल विस्कळीत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकात आज (26 जुलै ) सकाळच्या सुमारास पनवेल लोकल फ्लॅटफॉर्मवरुन निघाल्यानंतर पुढे जाण्याऐवजी मागे गेल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यामुळे पनवेल लोकलचा एक डब्बा रुळावरून घसरल्याची माहिती मिळत आहे. रेल्वे सेवा पुर्ववत आणण्याचे रेल्वेकडून प्रयत्न सुरू आहेत.
सीएसएमटी स्थानकात केवळ 2 प्लॅटफॉर्म हार्बर मार्गासाठी आहेत. त्यातल्या एका प्लॅटफॉर्मवर अपघात झाल्यानं एकच प्लॅटफॉर्म वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे हार्बर मार्गावर लोकल गाड्यांच्या खोळंबा होऊन वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
दरम्यान सकाळी 9 वाजून 39 मिनिटांनी CSMT वरुन पनवेलला जाणारी लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर होती. तिला ग्रीन सिग्नल दिल्यानंतर लोकल पुढे जाण्याऐवजी ती लोकल मागे आली आणि बफरला धडकली. यामध्ये कोणलाही दुखापत झालेली नाही. यामध्ये लोकलचा मागून चौथा कोच रुळावरुन घसरला आहे. सर्व प्रकारच्या यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांनी कोच पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.