Lawrence bishnoi Dawood ibrahim tshirt
फोटो माहितीसाठी वापरण्यात आला आहे. गुन्हेगारांच्या उदात्तीकरणाला थारा नाही.

टीशर्ट्सवर दाऊद इब्राहिम, लॉरेन्स बिष्णोई; विक्रेत्यांसह ई-कॉमर्स संकेतस्थळांविरोधात सायबर पोलिसांची कारवाई

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम, लॉरेन्स बिष्णोई यांचे उद्दात्तीकरण करणारे टीशर्ट विकणाऱ्या विक्रेत्यांसह ई-कॉमर्स संकेतस्थळांविरोधात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

ऐकावं ते नवलच. राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणानंतर लॉरेन्स बिश्नोई नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खान, अभिनेता शाहरूख खान यांना ही जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. समाज माध्यमांवर बिश्नोई गँगची चर्चेचा विषय ठरला. मात्र, लॉरेन्स बिष्णोईचे उद्दात्तीकरण होताना पाहायला मिळत आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली आहे.

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम, लॉरेन्स बिष्णोई यांचे उद्दात्तीकरण करणारे टीशर्ट विकणाऱ्या विक्रेत्यांसह ई-कॉमर्स संकेतस्थळांविरोधात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दाऊद इब्राहिम आणि लॉरेन्स बिष्णोईचे छायाचित्र असलेली टीशर्ट्सची काही संकेतस्थळांवर विक्री करण्यात येत होती. यामध्ये 4 प्रसिद्ध ई-कॉमर्स संकेतस्थळांवर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा समावेश असल्याची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाकडून देण्यात आली.

महाराष्ट्र राज्य सायबर विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाने सायबर सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महाराष्ट्र सायबर विभाग समाज माध्यमांसह डिजिटल माध्यमांचीही तपासणी करत असते. यावेळी सामाजिक परिस्थितीवर विपरित परिणाम होईल, अशा पोस्ट सापडल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येते.

दरम्यान, तपासणीत नुकत्याच समोर आलेल्या माहितीवरून प्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई आणि दाऊद इब्राहिम यांच्या छायाचित्रांसह त्यांचे उदात्तीकरण करणारे टी-शर्ट विक्रीसाठी उपलब्ध होते. गुन्हेगारी जीवनशैलीचे उदात्तीकरण करणारी अशी उत्पादने युवा वर्गावर नकारात्मक प्रभाव टाकू शकतात. या प्रकारची सामग्री समाजाच्या नैतिक मूल्यांना हानी पोहोचवते आणि गुन्हेगारी प्रवृत्तींचे उदात्तीकरण करते. त्यामुळे तरुणांवर चुकीच्या गोष्टींचा प्रभाव पडू शकतो, असे नमूद करत कारवाई करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलमांन्वये तसेच, माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र सायबर विभाग सुरक्षित डिजिटल वातावरण राखण्यासाठी आणि सार्वजनिक शांततेला धोका पोहोचवणाऱ्या सामग्रीला प्रतिबंध घालण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी विभागाकडून सांगण्यात आले.

लॉरेन्स बिश्नोईवर भारताच्या दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तो 70 हून अधिक गुन्हेगारी प्रकरणांशी संबंधित आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची हत्या आणि बॉलीवूड स्टार सलमान खानला धमक्या देणे यासह हाय-प्रोफाइल गुन्ह्यांमध्ये त्याच्या सिंडिकेटचा सहभाग आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com