Wayanad Landslide: केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन; 45 जणांचा मृत्यू, 70 जखमी
केरळच्या वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. या भूस्खलनात 100 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. बचावकार्यासाठी लष्कराचे 225 जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेत 45 जणांचा मृत्यू झाला असून 70 जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वायनाडमध्ये मंगळवारी पहाटे 4 वाजता दुसऱ्यांदा भूस्खलनाची घटना घडली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात 100 हून अधिक लोक अडकले. तर भूस्खलनात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. या दुर्घटनेनंतर 16 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या 16 जणांना वायनाडमधील मेप्पाडी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी या दुर्घटनेवर विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच सरकारी यंत्रणा मदतीसाठी धावल्या आहेत. या दुर्घटनेनंतर अनेक राज्यमंत्री या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.