पालखी निघाली राजाची...; लालबागच्या राजाची जंगी मिरवणूक
10 दिवसांच्या पाहुणचारानंतर लालबागचा राजा आज निरोप घेत आहे. दहा दिवसाचा उत्साहात गणेशोत्सव साजरा केल्यानंतर भाविक आज लाडक्या गणरायाला जड अंतकरणाने निरोप देणार आहेत. अनंत चतुर्दशी निमित्त ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत विसर्जन करण्यात येत आहे.
लालबागच्या राजाचा मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. लालबागच्या राजाला मंडपातून बाहेर काढण्यात येत आहे. बाप्पाच्या विसर्जनासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. लालबागचा राजा आता लालबाग मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेनं मार्गस्थ झाला आहे.
लालबाग मार्केटच्या गल्लीमध्ये राजाच्या स्वागतासाठी गणेशभक्तांनी नोटांचे, पाना-फुलांचे हार लावले आहेत. लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी लालबाग-परळमध्ये गणेश भक्तांनी गर्दी केली आहे. लालबागच्या राजाचा विजय असो... ही शान कुणाची... लालबागच्या राजाची.... अशा जयघोषात लालबागच्या राजाची जंगी मिरवणूक सुरु झाली आहे.