अर्ज न करताही लाडकी बहीण योजनेचे पैसे भावाला, जाफर शेख नावाच्या तरुणाच्या खात्यात पैसे
राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील 70 लाख महिलांच्या बँक खात्यात पैसेही जमा झाले असून महिलांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. यातच महिलांसाठी सुरु झालेल्या या योजनेचे पैसे चक्क एका पुरुषाच्या खात्यात जमा झाले आहेत. विशेष म्हणजे, या भावाने ना कोणता अर्ज केला होता, ना कोणती कागदपत्रे दिली तरी ही त्यांच्या खात्यात तीन हजार रूपये जमा झाले.
यवतमाळमध्ये एका पुरुषाच्या बँक खात्यात हजार रुपये जमा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. जाफर गफ्फार शेख या तरुणाच्या खात्यात पैसे जमा झालेल्या तरूणाचे नाव आहे. तो आर्णी शहरातील हाफीज बेग नगरातील रहिवासी आहे. सुशिक्षित बेरोजगार असलेल्या जाफर शेख याने ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी कोणताही अर्ज भरला नव्हता. तरीही त्याच्या बँक ऑफ बडोदा या बॅक खात्यात या योजनेचे तीन हजार रुपये शासनाने जमा केले आहे. या प्रकाराने खुद्द जाफरही हबकून केला आहे.
जाफर गफ्फार शेख म्हणाले, महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी महिलांच्या खात्यात या योजनेचे 3 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. तसाच एक मेसेज मला सुद्धा आला आहे. माझ्या खात्यात 3 हजार रुपये जमा झाल्याचा हा मेसेज आहे. बँक ऑफ बडोदामध्ये माझं खातं आहे. मी हे खातं 2012 ला उघडलं होतं. पंरतु माझ्या गावापासून ते खूप दूर असल्या कारणाने मी व्यवहार करत नाही. परंतु मेसेज आल्यानंतर मी यवतमाळला आलो. इथे आल्यानंतर मी खात्याची चौकशी केली. चौकशी केल्यानंतर माझ्या खात्याची चौकशी करावी लागेल असं सांगण्यात आलं.