कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत
भारत गोरेगावकर : रायगड | कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ओव्हर हेड वायर तुटल्याने कोकण रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. दिवाण खवटी स्टेशन जवळ ओव्हर हेड वायर तुटल्याची माहिती मिळत आहे. यामुळे कोकण कन्या एक्सप्रेस ही गेल्या 5 तासांपासून वीर रेल्वे स्थानकात उभी करण्यात आली आहे. या ट्रेनला डिझेल इंजिन लावून गाडी पुढे नेण्याचे प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे.
कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचे काम झाल्यानंतर हा पहिलाच मोठा फटका कोकण रेल्वेला बसलेला आहे. सद्यस्थितीला केवळ डिझेल इंजिन असलेल्या रेल्वेची वाहतूक कोकण रेल्वे मार्गावरून उशिरा सुरू आहे. कोकणातील सर्वच ट्रेन उशिरा धावत असल्यामुळे प्रवाशांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या घटनेचा फटका राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना देखील बसला असून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आजचा रत्नागिरी जिल्हा दौरा रद्द केला आहे.