Khuda Haafiz 2 वादाच्या भोवऱ्यात; गाण्यातील 'या' शब्दावर मुस्लिम समाजाचा आक्षेप
विद्युत जामवाल हा त्याच्या अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखला जातो. 'खुदा हाफिज : चॅप्टर 2 अग्निपरीक्षा' हा त्याचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र आता हा चित्रपट रिलीज होण्याआधीच वादात सापडला आहे. 'खुदा हाफिज 2'मधील 'हक हुसैन' हे गाणं नुकतंच रिलीज झालं. या गाण्यावर मुस्लिम समाजाने आक्षेप घेतला आहे. त्यानंतर आता निर्मात्यांनी एक निवेदन जाहीर करून माफी मागितली आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता असं निर्मात्यांनी सांगितलं आहे. तरी यावर कोणाला आक्षेप असल्यास आम्ही त्याबद्दल माफी मागतो असं स्पष्ट करण्यात आलं आहे. (Khuda Haafiz 2 movie in controversy shia muslims objection on haq hussain song)
'हक हुसेन' या गाण्यावर नाराजी व्यक्त करताना शिया मुस्लिम समुदायाने सांगितलं की, गाण्यात 'हुसैन' हा शब्द वापरण्यात आला असून त्यात आक्षेपार्ह दृश्य आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक फारुख कबीर यांच्याविरोधात हैदराबादमधील डबीरपुरा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. या तक्रारीत चित्रपटातून गाणं काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती. निर्मात्यांनी निवेदनात म्हटलं आहे की, ते गाणं बदलतील आणि माफीही मागतील.
'खुदा हाफिज : चॅप्टर 2 अग्निपरीक्षा' चे निर्माते म्हणून आम्ही शिया समुदायाच्या लोकांनी उपस्थित केलेल्या आक्षेपाची दखल घेत आहोत. आम्ही याबद्दल माफीही मागतो. चित्रपटातील 'हक हुसैन' या गाण्याने अनावधानाने कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या असतील तर आम्ही दिलगीर आहोत. या गाण्यात 'हुसैन' हा शब्द वापरल्यामुळे काही लोकांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आम्ही गाण्यात बदल करण्याचा निर्णय घेतला. सेन्सॉर बोर्डाशी चर्चा केल्यानंतर आम्ही या गाण्यातून तो हटवला आहे. तसें, गाण्याचे बोल बदलून, “हक हुसैन” ऐवजी “जुनून है” असं केलं आहे.