खंबाटकी घाटातील प्रवास होणार सुखकर; नवीन बोगदा पुढील वर्षी होणार पूर्ण
प्रशांत जगताप | सातारा : पुणे-सातारा महामार्गावरील महत्वाचा भाग म्हणजे खंबाटकी घाट (Khambatki Ghat). परंतु, हा खंबाटकी घाटातील रस्ता लवकरच इतिहासजमा होणार आहे. खंबाटकी घाटातील नवीन सहा-पदरी बोगदा पुढील वर्षी म्हणजेच मार्च 2023 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी (NItin Gadkari) यांनी दिली आहे.
पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील नवीन सहापदरी बोगद्याचे बांधकाम प्रगतीपथावर असून पुढील वर्षी मार्च महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे. खंबाटकी घाटाच्या कामाच्या प्रगतीविषयी माहिती देणारा ट्विट नितीन गडकरी यांनी केले आहे. यानुसार पुणे-सातारा या राष्ट्रीय महामार्ग क्र.4 वर सध्या प्रत्येकी 3 मार्गिका असलेल्या दुहेरी बोगद्याचे काम सुरु असून इंग्रजीवर्णाक्षर 'एस' प्रमाणे असलेल्या वळणमार्गाचे कामही लवकरच पूर्ण होईल. यामुळे या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांमध्ये मोठी घट होईल.
तसेच, पुणे-सातारा आणि सातारा-पुणे कडील या बोगद्यातून लागणारा प्रत्येकी ४५ मिनीटे आणि १० ते १५ मिनिटांच्या वेळेत घट होऊन केवळ ५ ते १० मिनिटात या बोगद्यातून प्रवास करता येईल. 6.43 किमी लांबीच्या या प्रकल्पासाठी अंदाजे 926 कोटी रुपये खर्च येणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे.