Ketaki Chitale|सुटका नाहीच; केतकीला 14 दिवसांची कोठडी
मुंबई : वादग्रस्त पोस्ट करुन चर्चेत राहणारी मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिच्या अडचणीत वाढ होताना दिसत असून तिचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. बौद्ध धर्मासंदर्भात केलेल्या एका आक्षेपार्ह पोस्टमुळे केतकीवर अॅट्रॉसिटीचा (Atrocity) गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर सुनावणी करताना ठाणे न्यायालयाने केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
केतकी चितळे हिच्या कोठडीची मुदत संपल्यामुळे तिला आज ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यामुळे केतकीचा 7 जूनपर्यंत जेलमध्येच राहावे लागणार आहे.
केतकीने 1 मार्च 2020 रोजी रविवारी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. यात तिने लिहिले होते की, नवबौद्ध, 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क', आम्ही फक्त हिंदू, असा शब्द उद्गारला तर घोर पापी, कट्टरवादी? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो, असे तिने फेसबुक पोस्टमध्ये म्हंटले होते. यावर आक्षेप घेत स्वप्निल गोविंद जगताप यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
तर, केतकी चितळेने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर देखील आक्षेपार्ह लिखाण केले आहे. यावर अनेक नेत्यांनी तिच्यावर टीकाही केली. तसेच, ठिकठिकाणी केतकीवर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल करण्यात आल्या आहेत. दरम्यान, न्यायालयाने केतकीला वादग्रस्त पोस्ट डिलीट करण्यास सांगितले होते. परंतु, या पोस्ट डिलीट करण्यास केतकीने स्पष्ट नकार दिला होता. याचे अनेकांनी कौतुकही केले होते.