दिघे साहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्हीच केली; आनंद दिघेंच्या पुतण्याचा CM शिंदेंवर संताप
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यानतंर एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. धर्मवीर आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण हा निर्णय घेतल्याचं एकनाथ शिंदे वारंवार सांगतात. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या घेतलेल्या मुलाखतीवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, जर माझी मुलाखत घेतली तर भुकंप होईल असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यानंतर आज मनमाडमध्ये झालेल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी "दिघे साहेबांसोबत जे घडलं त्याचा मी साक्षीदार आहे, योग्य वेळी नक्की बोलेन" असं सांगितलं. त्यानंतर आता आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतल्यापासूनच एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. त्यावेळी एकनाथ शिंदेंसोबत न गेल्याने केदार दिघे यांची मोठी चर्चा झाली. त्यानंतर आता त्यांनी शिंदे यांना थेट उत्तर देणं सुरु केलं आहे. शिंदेंच्या आजच्या वक्तव्यावर केदार दिघे म्हणाले की, "मुख्यमंत्री शिंदे म्हणतात आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार....मग मी म्हणतो इतके दिवस गप्प का बसलात? माहित असूनही तुम्ही 25 वर्षे गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी आणि दिघे साहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे. सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल?" असा सवाल केदार दिघेंनी केला आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यावर नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, मनमाड येथील भाषणात एकनाथ शिंदे म्हणैलो, आम्ही धर्मवीरांचे शिष्य आहोत म्हणून सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही काम करू. या राज्याला विकास निधी कमी पडून देणार नाही असा हा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. पुढच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाचे 200 आमदार निवडून येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. धर्मवीर चित्रपट काही लोकांना पचला नाही. ज्या दिवशी माझी मुलाखत होईल त्या दिवशी या देशात राजकीय भूकंप होईल, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आम्ही बंडखोरी केली नाही आम्ही क्रांती केली. ते जर अजून टीका करत राहिले पुढे मला ही तोंड उघडावं लागेल. धर्मवीरांच्या बाबतीत जे काही झालं त्याचाही मी साक्षीदार आहे, योग्य वेळी नक्की बोलेन, असा इशाराही एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंना दिला आहे. स्मिता ठाकरे, निहार ठाकरे, यांनी ही मला भेटून शुभेच्छा दिल्यात, असं शिंदे म्हणाले.