"...तर मग जय शाह कोण?"; घराणेशाहीच्या आरोपानंतर के.सी.आर यांचा मोदींवर निशाणा
हैद्राबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुरुवारी तेलंगणातील हैद्राबाद (Hyderabad) शहरात एका सभेत राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, तेलंगणाचा (Telangana) संघर्ष हा केवळ एका कुटुंबाच्या सत्तेसाठी सर्व डावपेच वापरून नव्हता. पंतप्रधान म्हणाले, राजकीय घराणेशाहीमुळे देशातील तरुणांना राजकारणात येण्याची संधीही मिळत नाही. घराणेशाही अशा प्रत्येक तरुणाच्या स्वप्नांचा चुराडा करतो आणि त्यांच्या राजकारणात येण्याची दारं बंद करतो. यावर आता केसीआर यांच्या पक्षाने प्रत्युत्तर दिलं आहे. 'पंतप्रधान मोदी देशाच्या पंतप्रधानांसारखे बोलले नाहीत तर भाजपच्या नेत्यासारखे बोलले.' असं म्हणत केसीआर यांच्या पक्षाने मोदींना प्रत्युत्तर दिलं आहे.
घराणेशाहीबद्दल मोदींनी केलेल्या टीकेवर बोलताना टीआरएसचे प्रवक्ते कृशांक माने यांनी, भारताच्या क्रिकेटचं नेतृत्व करणारे जय शहा कोणाचे पुत्र आहेत? असा सवाल उपस्थित करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह हे बीसीसीआयचे सचिव आहेत असं म्हणत भाजपमधल्या घराणेशाहीवर निशाणा साधला. तसंच घराणेशाहीला विरोध असेल तर मग राजनाथ सिंह आणि त्यांच्या मुलाची हकालपट्टी करावी अशी मागणीही केली.
सीएम केसीआर यांनीही पीएम मोदींच्या टीकेला तिखट शब्दांत उत्तर दिलं आहे. बेंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी पंतप्रधानांच्या हल्ल्याला भाषणबाजी असल्याचं म्हणत फेटाळून लावलं. देशाच्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष वेधत ते म्हणाले, "परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहेत. मात्र दररोज फक्त भाषणं केली जात आहेत. जीडीपी घसरतेय, महागाई वाढतेय. देश बदलला पाहिजे, तर देश बदलेल."
विशेष म्हणजे, आपल्या भाषणात, पंतप्रधान म्हणाले होते की, तेलंगणातील लोक हे पाहताहेत की, जेव्हा एका कुटुंबाला समर्पित पक्ष सत्तेवर येतात तेव्हा त्या कुटुंबातील सदस्य भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे चेहरे बनतात. तेलंगणातील लोक हे पाहत आहेत की, कौटुंबिक पक्ष केवळ स्वतःची भरभराट करतात आणि आपली तिजोरी भरतात. पंतप्रधानांनी हे अधोरेखित केलं की जेव्हा राजकीय घराणेशाही सत्तेतून काढून टाकली जाते तेव्हा विकासाचे मार्ग खुले होतात.