कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक; अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. चिंचवडमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप यांनी अर्ज भरला आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्यापही कोणाचचं नाव जाहीर करण्यात आलं नाही. चिंचवडच्या जागेसाठी ठाकरे गटही आग्रही असल्याच्या चर्चेमुळे अद्याप नाव जाहीर केलं नसल्याच्या चर्चा आता पुन्हा सुरू झाल्या आहेत.
भारतीय जनता पक्षाने स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना रिंगणात उतरवले आहे. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस ही जागा लढविणार असून, उमेदवाराच्या नावाची घोषणा रविवारी रात्रीपर्यंत करण्यात आलेली नव्हती. मात्र, काँग्रेसचा उमेदवार सोमवारी सकाळी अर्ज भरेल, असे काँग्रेसतर्फे अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले.
७ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. प्राप्त उमेदवार अर्जांची छाननी ८ फेब्रुवारीला होणार आहे. १० फेब्रुवारी हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर २६ फेब्रुवारीला मतदान होणार असून मतमोजणी २ मार्च रोजी होणार आहे.