अल्पवयीन मुलींवर बलात्कार प्रकरणी महंत शिवमूर्तींना अटक; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
बंगळुरु : कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील मुरुगा मठाचे महंत शिवमूर्ती मुरुगा शरनारू यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. यानंतर वैदयकीय तपासणीनंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी महंत आणि इतर चार जणांविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO), अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा आणि भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर सात दिवसांनी महंत यांना अटक करण्यात आली.
शरनारू हे राज्यातील प्रमुख लिंगायत मठाचे धार्मिक नेते आहेत. जानेवारी 2019 ते जून 2022 या कालावधीत त्याच शाळेत शिकणाऱ्या आणि वसतिगृहात राहणाऱ्या 15 आणि 16 वर्षांच्या दोन मुलींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. रात्री उशिराने त्यांना अटक करण्यात आली. वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलं असून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.