"संभाजीराजे छत्रपतींना Z+ सुरक्षा द्या" स्वराज्यच्या करण गायकरांची मागणी
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात 'हर हर महादेव' या चित्रपटावरून वाद सुरू आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेऊन ऐतिहासिक चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड होत आहे असं म्हणत, 'चित्रपटांमधील इतिहासाची मोडतोड सहन करणार नाही' असा थेट इशाराच त्यांनी दिला. 'हर हर महादेव' आणि 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटांवर त्यांचा आक्षेप असल्याचं त्यांनी म्हटलं. संभाजीराजेंच्या पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी शो बंद पाडला तर मनसेच्या अविनाश जाधव यांनी पुन्हा तो शो सुरू केला. या सर्व घटनांमुळे राज्यातील राजकीय परिस्थिती चांगलीच तापली आहे. त्यामुळे स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते व छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी संभाजीराजेंना असलेली Y+ सुरक्षा हटवून Z+ सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.
काय आहे मागणी करण्यामागचं कारण?
"तमाम मावळ्यांचा आपणास जय शिवराय!" असं म्हणत करण गायकरांनी पत्राला सुरूवात केली. तर, पुढे त्यांनी पत्रामध्ये, "आपण हेही जाणता की,चित्रपट सृष्टीवर माफिया,अंडरवर्ल्डमधील कुख्यात मंडळींचा वरचष्मा आहे. त्यांच्या अजेंड्याला विरोध करणाऱ्या मंडळीविरुद्ध प्राणघातक कट रचून अंमलातही आणले जातात. हा इतिहास नजरेसमोर असल्याने छत्रपततींच्या पराक्रमी इतिहासाचे विडंबन करण्यास विरोध करणारे संभाजी राजे यांचे जीवितास धोका निर्माण झाला आहे, असे आम्हा तमाम मावळ्यांचा संशय आहे." असं म्हटलं. हा संशय व्यक्त करत करण गायकर यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली आहे.
नेमकी मागणी काय?
"छत्रपतींना सध्या असलेले y +दर्जाचे संरक्षण ऐवजी z+ संरक्षण देण्यास आमची आग्रहाची विनंती आहे.
दुर्दैवाने कुणा दुष्ट शक्तीने छत्रपती संभाजी राजेंकडे वक्र दृष्टीने पाहिले तरी त्याचे दुष्परिणाम काय होतील हेही आपण जाणताच. सबब आपण महाराष्ट्र समाजाची विनंती मान्य करून छत्रपतींच्या संरक्षणात वाढ करावी ही पुन्हा एकदा विनंती." असं लिहीत करण गायकर यांनी मागणी केली आहे.
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे या मागणीला किती गांभीर्याने घेतात व करण गायकर यांची ही मागणी पूर्ण होते का हे पाहणं गरजेचं आहे.