कन्हैयालालची हत्या करणाऱ्या आरोपींचे, पाकिस्तान ते सौदी संबंध
उदयपूरमधील टेलरींग काम करणाऱ्या कन्हैया लालच्या निर्घृण हत्येच्या तपासात एकापाठोपाठ एक मोठे खुलासे होत आहेत. आता असं समोर आलंय की, रियाझ अत्तारी व्यतिरिक्त हत्येचे इतर सूत्रधार व्हर्च्युअल प्रॉक्सी सर्व्हर वापरून पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये कॉल करत होते. मारेकरी एका पाकिस्तानी नागरिकाशी फोनवर बोलायचे, हा नागरिक त्याला सौदी अरेबियात भेटला होता. कन्हैयाचा गळा चिरून खून करणारा अत्तारी 2019 मध्ये आपली जमीन विकून सौदीला गेला होता, तिथे तो संबंधीत व्यक्तीला भेटला.
सुरक्षा यंत्रणांच्या तपासात असं समोर आलंय की, रियाझला मदत करणाऱ्या काही षड्यंत्रकर्त्यांनी त्यांचे इंटरनेट प्रोटोकॉलचे (आयपी) पत्ते लपवण्यासाठी त्यांच्या मोबाइल फोनवर व्हीपीएनचा वापर केला. कन्हैयालालच्या हत्येच्या काही दिवस आधी त्याने व्हीपीएन वापरून सौदी अरेबिया आणि पाकिस्तानला कॉलही केले होते. 20 जून रोजी नुपूर शर्माच्या विरोधात काढण्यात आलेल्या रॅलीनंतर स्थानिक अंजुमनच्या बैठकीत कन्हैया लालला मारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 26 जून रोजी मारेकरी कन्हैया लालच्या दुकानात त्याचा शिरच्छेद करण्यासाठी गेले होते, मात्र कन्हैया त्या दिवशी दुकानात गेला नव्हता.
दोन्ही मारेकरी दावत-ए-इस्लामीचे
आरोपींकडून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा फॉरेन्सिक अहवाल अद्याप समोर आलेला नाही, मात्र आता हे स्पष्ट झालंय आहे की, अत्तारीने 2019 मध्ये सौदी अरेबियामध्ये सिंधमधील पाकिस्तानी नागरिक ओमरची भेट घेतली होती. याशिवाय 2014 मध्ये दावत-ए-इस्लामीच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दोघंही पाकिस्तानातील कराचीमध्ये गेले होते. दोन्ही मारेकरी दावत-ए-इस्लामीचे सदस्य आहेत.