अभिनेत्री कंगना रणौतला दिलासा; इमर्जन्सी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
अभिनेत्री कंगना रणौतच्या इमर्जन्सी चित्रपटाला अखेर सेन्सॉर बोर्डाकडून हिरवा कंदील देण्यात आलाय. गेल्या महिन्यात काही शीख संघटनांनी चित्रपटातील दृश्ये आणि संदर्भांवर आक्षेप घेत चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. प्रकरण कोर्टात पोहोचलं होतं. सेन्सॉर बोर्डाचं प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचं कंगना रणौत यांनी सांगितलं होतं. अखेर सेन्सॉर बोर्डानं चित्रपटाला तीन प्रकारचे संदर्भ वगळण्यासह काही ऐतिहासिक व्यक्तींच्या तोंडी दिलेल्या संवादांना सत्याधारित संदर्भ देण्याच्या अटीवर प्रदर्शनाची परवानगी दिली आहे.
'इमर्जन्सी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासुन चित्रपटाबाबत जोरदार चर्चा सुरु होत्या. 6 सप्टेंबरला प्रदर्शीत होणाऱ्या चित्रपटाला स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता चित्रपटातील काही भाग वगळल्यानंतर चित्रपटाला 'UA' प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. कंगना इमर्जन्सीमध्ये माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहेत.