Kaali Controversy : दिग्दर्शक मनिमेकलाईंना कोर्टाचं समन्स; 6 ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश
Kaali Poster Controversy: दिल्ली न्यायालयाने सोमवारी काली पोस्टरवरुन निर्माण झालेल्या वादावर चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई (Leena Manimekalai) आणि अन्य काही लोकांना समन्स जारी केलं आहे. त्यांना 6 ऑगस्ट रोजी हजर राहण्यास सांगितलंय. याचिकाकर्त्याने पोस्टर्स आणि व्हिडिओंमध्ये आणि वादग्रस्त ट्विटमध्ये देवी कालीचं चित्रण करण्यापासून तात्पुरते प्रतिबंधित करण्यासाठी अंतरिम आदेशाची मागणी केली आहे. टोरंटोमध्ये राहणाऱ्या चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई यांनी अलीकडेच ट्विटरवर "काली" या लघुपटाचं पोस्टर शेअर केलं आहे, ज्यामध्ये हिंदू धर्माचं दैवत काली देवी धूम्रपान करताना तसंच देविच्या हातात LGBTQ समुदायाचा ध्वज दिसत आहे.
चित्रपटाचं पोस्टर रिलीज केल्यानंतर, लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल लीनाचा अनेकांकडून निषेध होतोय. अनेक लोकांनी त्यांच्या अटकेची देखील मागणी केली आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर नोंदवला होता. पोलिसांनी ५ जुलै रोजी चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई यांच्या 'काली' चित्रपटाच्या वादग्रस्त पोस्टर प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. दिल्ली पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत लीनाच्या विरोधात एका वकिलाने आरोप केला होता की, सोशल मीडियावर 'देवी काली' सिगारेट ओढताना दाखवणारं पोस्टर त्यांनी प्रसारित केलं आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या इंटेलिजेंस फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन (IFSO) युनिटने प्रथमदर्शनी दोन गटांमध्ये धर्म, वंश इत्यादी कारणांवरून भेदभाव करणे, (जाणूनबुजून धर्माचा अपमान करून धार्मिक भावना भडकावणे) अशा गुन्ह्यांसाठी कलम 295A अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. त्याचवेळी, वाद वाढल्यानंतर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने फिल्ममेकर लीना मनिमेकलाई यांचे ट्विट काढून टाकले. या ट्विटमध्ये त्यांनी 'काली' चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं होतं.