मुंबई-गोवा महामार्गावर रिफायनरी समर्थकाने पत्रकाराला चिरडले?
कोकणात मुंबई गोवा महामार्गावर राजापूर येथे झालेल्या अपघाताला आता वेगळ वळण मिळाले आहे. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या विरोधात बातमी देणारे पत्रकार शशिकांत वारीशे यांना गाडीने उडवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या सगळ्या घटनेची गंभीर दाखल आता मराठी पत्रकार परिषदेकडूनही घेण्यात आली आहे.
सकाळी ज्याच्या विरोधात बातमी येते, त्याच्याच गाडीची धडक बसून पत्रकाराचा मृत्यू होतो, हा योगायोग असू शकतो? तर नक्कीच नाही.. हा ठरवून घडवून आणलेला घातपात असून त्याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे राज्य प्रमुख एस.एम देशमुख यांनी केली आहे.
कोकणातील पत्रकार शशिकांत शंकर वारिसे यांची मृत्युशी झुंज अपयशी ठरली आहे. याप्रकरणी पंढरीनाथ आंबेरकर नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.