"आज संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता, निर्लज्जपणे दमनशाही सुरु"
मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ईडीच्या (ED) पथकाने धाड टाकली आहे. सात तासांपासून कुटुंबियांची चौकशी सुरु आहे. संजय राऊत यांच्या भांडुपनंतर कांजूरमार्ग आणि दादर येथील घरावरही ईडीने धाडी टाकल्या आहेत. कांजूरमार्ग येथील मैत्री बंगला आणि दादर येथील गार्डन कोर्ट येथील घरावर हा छापा टाकला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर, राऊतांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली असून ठिय्या आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेते इनकमींग देखील सुरुच आहे. आज शिवसेना खासदार राजन विचारे यांनी कार्यकर्त्यांची फौज शिवसेनेत आणली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ईडीवर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आज संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता आहे. निर्लज्जपणे ही दडपशाही सुरु आहे. संजय राऊत यांनी आज रोखठोकच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर आता त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. आज जे हिंदुत्वाचं नाव घेत आहेत, ते अमरनाथ यात्रेवर हल्ले होत असताना काय करत होते? तेव्हा हे कुठे रांगत होते माहिती नाही. आता मात्र यांना हिंदुत्वाची आठवण येतेय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी महाराष्ट्रचा अपमान केल्यानंतरही हे मुळमूळीत प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राचा अपमान झाला तरी चालेल मात्र आम्ही तुमचे जोडे उचलणार अशी भूमिका आता या लोकांनी घेतली आहे.
"हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच पक्षप्रमुख सन्मा. श्री उद्धवसाहेब ठाकरे आणि आदित्यसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून श्री. जयनाथ पूर्णेकर यांनी त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांसोबत शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला." असं ट्विट करत खासदार राजन विचारे यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे पक्षाला एकीकडे ४० पेक्षा जास्त आमदार सोडून गेले असताना दुसरीकडे वेगवेगळ्या भागांत कार्यकर्ते शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहे.