Jayant Patil : पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरून जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले...
पुण्यात एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलं ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये हॉटेलमधील वॉशरुमममध्ये टॉयलेटजवळ बसून ते ड्रग्ज घेत असल्याचे दिसून येत आहे.
याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिलेली आहे. जयंत पाटील म्हणाले की, गेली काही वर्षे पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठला असून देशभर गाजलेल्या ललित पाटील प्रकरणानंतर काल पुण्यात काही अल्पवयीन मुलांचे हॉटेल मध्ये ड्रग्ज सेवन करतानाचे व्हिडियो व्हायरल झाल्यावर पुणे पोलिसांना जाग येऊन पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला. थोडक्यात काय तर पोलिसांना गुन्ह्यांची माहिती आता त्यांच्या खबऱ्यांकडून मिळत नसून ती सोशल मीडियावर मिळत आहे.
यासोबतच ते म्हणाले की, अगरवाल पॉर्शे कार अपघात प्रकरणात तर थेट मुलाच्या रक्ताच्या जागी मुलाच्या आईचे रक्त बदलून ठेवण्यात आले. पैशांच्या जोरावर व्यवस्थेला कशाप्रकारे वाकवले जाते, याचे समोर आलेले हे एकमेव उदाहरण आहे. लोकांच्या नजरेसमोर कधीही आले नाहीत, असे हजारो प्रकार असावेत. ‘विद्येचे माहेरघर’ अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’ अशी होत असून यामागे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा जबाबदार आहे. पुणे शहर हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे शहर आहे. मूळ पुण्याची जगभर असलेली ओळख पुसून जाऊन हे शहर आज सत्ताधारी भाजपा शिंदे गटाच्या सरकारमुळे बदनाम होत आहे. असे जयंत पाटील म्हणाले.