शिंदे, फडणवीसांचे दिल्ली सांभाळण्यात दिवस जातायत - जयंत पाटील
मराठवाड्यातील शेतकऱ्यांची झालेली हानी आणि पुणे शहराची प्रचंड वाताहात लक्षात घेता सरकारने जनतेच्या मदतीला जायला पाहिजे होते मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचे दिल्लीला सांभाळण्यात दिवस जात असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली. पुण्यात प्रलय आल्याने शहराची वाताहात झाली त्यामुळे सामान्य नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम झाला तर दुसरीकडे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झाली आहे मात्र मुख्यमंत्री इतर गोष्टीत अडकलेले आहेत असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
मराठवाड्यातील सहा जिल्हयात पावसाने अतिशय गंभीर परिस्थिती केली आहे. शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने बळीराजाच्या पाठीशी तातडीने उभे राहून त्यांची दिवाळी समाधानाने जाईल याची व्यवस्था करावी अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली. सरकारने शिधा वाटपाची घोषणा उत्साहात केली.
सरकार आपली प्रतिमा सुधारण्याच्या गडबडीत आहे त्यातून घोषणा केली मात्र पैशांची जुळणी झालेली नाही असा आरोप करतानाच जुळणी झाली तर किमान दिवाळीच्या अगोदर घोषणा केल्याप्रमाणे वागावे अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली. मात्र सरकारने दिवाळी गोड करणार अशी घोषणा करुन पैशांची तजवीज केली नाही यातून सरकारची अकार्यक्षमता लक्षात येते असा हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केला.