काश्मिरी पंडितांवर हल्ले; गृहमंत्री अमित शाह घेणार बैठक
गेल्या काही आठवड्यांत जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu kashmir) टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये मोठी वाढ होतेय. त्यावरुन विरोधीपक्षाकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. काश्मीर फाईल्स या चित्रपटाचं कौतुक करणारे सध्या होणाऱ्या घटनांवर गप्प का आहेत असा सवाल काँग्रेसने केला आहे. त्यानंतर आता केंद्रातील मोदी सरकार कठोर पावलं उचलणार असल्याची शक्यता आहे. केंद्रशासित प्रदेशातील सद्यस्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत.
अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संभाव्य बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल देखील उपस्थित राहणार आहेत. काश्मीरमधील अल्पसंख्याक समुदाय सुरक्षित असून, पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून कोणताही धोका नाही, तुम्ही घाबरु नका... हा संदेश देण्यासाठी ही बैठक होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या जम्मू-काश्मीरच्या आढावा बैठकीदरम्यान नागरी आणि पोलीस प्रशासनाला ठोस सूचना देणार आहेत. या बैठकीला अजित डोवाल यांच्याशिवाय जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, गुप्तचर विभागाचे उच्च अधिकारी, मुख्य सचिव आणि डीजीपी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, जम्मू आणि काश्मीर पोलिसांचा असा विश्वास आहे की कुलगाममधील बँक व्यवस्थापक विजय कुमारसह अल्पसंख्याक समुदायाच्या लक्ष्यित हत्येत पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद (JeM) या संघटनांकडून हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे आता शहा यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीवर लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे.