नुपूर शर्माला माफ करा, जमात उलेमा-ए-हिंदची मागणी; ओवैसींवर केली टीका
नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद यांच्यावर भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात निदर्शने आणि हिंसाचाराच्या घटनांवर जमात उलेमा ए हिंदने प्रतिक्रिया दिली आहे. जमात उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना सुहैब कासमी म्हणाले की, प्रेषित मुहम्मद यांच्यावर कथितपणे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या माजी नेत्या नुपूर शर्मा यांना इस्लामनुसार माफी देण्यात यावी. ते म्हणाले की मुस्लिम विद्वानांच्या संघटनेने त्यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी निषेधाशी असहमत आहे.
शुक्रवारच्या नमाजानंतर शर्मा यांच्या वक्तव्याचा देशभरात निषेध करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र आले होते. त्यानंतर काही ठिकाणी हिंसाचार देखील झाला. यानंतर जमात उलेमा-ए-हिंदने आज दिल्लीत पत्रकार परिषद बोलावली. संघटनेचे सुहैब कासमी म्हणाले की, देशातील बहुतांश मुस्लिम संघटना फक्त 200 दशलक्ष मुस्लिमांबद्दल बोलतात, 135 कोटी भारतीयांबद्दल बोलत नाहीत. 10 जून रोजी संपूर्ण देशात अशाच प्रकारचं धरणे आंदोलन सुरू झालं. कुठल्यातरी अजेंड्याखाली दंगल झाली. मदनी, ओवैसी सारखे लोक ढोंग करत आहेत असा आरोपही त्यांनी केला.
सुहैब कासमी म्हणाले, कोणत्याही मोठ्या संघटनेनं या आंदोलनांचं नेतृत्व केलं नाही. तसंच यामुळे काही सामान्य मुस्लिमांचा मृत्यू देखील झाला. त्यानंतर संघटनेनं हे स्पष्ट केलं की, आम्ही कोणत्याही हिंसाचाराच्या बाजूने नाही. हिंसा हा मोठा गुन्हा आहे हे इस्लाममध्ये लिहिलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.