...अन् मैदानात आलं जेक फ्रेझरचं वादळ! 4,4,6,4,6,6, चौकार षटकारांचा पाऊस पाडून विक्रमाला घातली गवसणी
यंदाच्या आयपीएल हंगामात सनरायजर्स हैदराबादने तिसऱ्यांदा २५० धावांचा टप्पा पार केला. यावेळी दिल्ली कॅपिटल्सविरोधात हैदराबादने धावांचा डोंगर रचला. ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा आणि शाहबाज अहमदच्या आक्रमक खेळीमुळं एसआरएचने २० षटकांत ६ विकेट्स गमावून २६७ धावांपर्यंत मजल मारली. परंतु, दिल्ली कॅपिटल्सचा युवा फलंदाज जेक फ्रेझर मॅकगर्कने वादळी खेळी करून १५ चेंडूत अर्धशतक ठोकलं. फ्रेझरने यंदाच्या आयपीएल हंगामातील सर्वान वेगवान अर्धशतकी खेळी केली. आयपीएल इतिहासातील हे तिसरं सर्वात वेगवान अर्धशतक आहे. तर दिल्ली कॅपिटल्ससाठी फ्रेझरने सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा कारनामा केला.
फ्रेझर-मॅकगर्कच्या अर्धशतकीय खेळीत सात षटकार आणि पाच चौकारांचा समावेश होता. त्याने फक्त १८ चेंडूत ६५ धावा कुटल्या. एसआरच्या वॉशिंग्टनस सुंदरच्या षटकात फ्रेझरने चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. सहा चेंडूत ३० धावा कुटण्याचा पराक्रम करत फैझरने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
इथे पाहा जेक फ्रेझरच्या वादळी खेळीचा व्हिडीओ
हैदराबादच्या ट्रैविस हेड आणि अभिषेक शर्माने सलामीला येत धडाकेबाज फलंदाजी केली. या जोडीनं पॉवर प्ले मध्ये सर्वात जास्त धावा करुन नव्या विक्रमला गवसणी घातली. पहिल्याच चेंडूपासून हेड आणि शर्माने दिल्लीच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. मैदानात चौकार षटकारांचा मारा करत हेड-शर्माने सहा षटकांमध्ये १२५ धावांचा डोंगर रचला होता.