IPL Media Rights Auction LIVE : राईट्स विकत घेण्यासाठी 42 हजार कोटींपर्यंत बोली
IPL मीडिया राइट्स ऑक्शन LIVE: भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी (BCCI) आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या मीडिया हक्कांबाबत मुंबईत लिलाव सुरू आहे. हे लिलाव 2023 ते 2027 या वर्षासाठी होत असून बीसीसीआयला पैशांचा पाऊस अपेक्षित आहे. सध्या, आयपीएलचे मीडिया अधिकार डिस्ने-स्टारकडे आहेत, हा करार आयपीएल 2022 ला संपेल.
मीडिया राईट्सच्या लिलावात कोणी भाग घेतला?
बीसीसीआयने यावेळी आयपीएल मीडिया हक्कांची मूळ किंमत 32 हजार कोटी रुपयांहून अधिक ठेवली आहे. या क्षेत्रातील अनेक कंपन्या या लिलावासाठी तयार आहेत. आज मुंबईत होणाऱ्या लिलावात रिलायन्सचे वायाकॉम-18, झी, सोनी, स्टार-डिस्ने यांचा समावेश आहे. यापूर्वी अॅमेझॉनही मीडिया राईट्सच्या शर्यतीत होती, मात्र त्याच दिवशी अॅमेझॉनने या लिलावातून आपलं नाव मागे घेतलं.
दरम्यान, आयपीएल मीडिया राईट्सचा लिलाव जोरात सुरू आहे. आतापर्यंत सर्वात मोठी किंमत 42 हजार कोटींच्या पुढे गेली असून ती 50 हजार कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या मीडिया राईट्स लिलावापेक्षा ही किंमत तिप्पट आहे. विशेष म्हणजे केवळ दोन पॅकेजसाठी 42 हजार कोटी रुपयांची बोली लागली आहे. यामध्ये टीव्ही राईट्स आणि डिजिटल राईट्सचा समावेष आहे. मीडिया अधिकारांची रक्कम खूप जास्त असू शकते.
लिलावाची पद्धत नेमकी कशी आहे?
लिलावाच्या पद्धतीमध्ये यावेळी अनेक बदल झाले असून डिजिटलवर अधिक भर दिला जातोय. यामुळेच आयपीएल 2023 ते आयपीएल 2027 पर्यंत मीडिया अधिकार चार पॅकेजमध्ये विभागले गेले आहेत.
• टीव्ही मीडिया राईट्स
• डिजिटल मीडिया राईट्स
• प्लेऑफ सामन्यांचे राईट्स
• भारताबाहेरचे राईट्स
टीव्ही मीडिया राइट्ससाठी प्रति सामन्याची मूळ किंमत 49 कोटी एवढी आहे. डिजिटल मीडिया राइट्सची प्रति सामन्याची मूळ किंमत 33 कोटी रुपये आहे. तर पॅकेज-सी ची किंमत प्रति सामना 11 कोटी रुपये तर पॅकेज-डी ची किंमत 3 कोटी रुपये आहे आहे.