इंडोनेशियाने भारताकडे सोपवले G-20 चे अध्यक्षपद
आज G20 शिखर परिषदेचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. यादरम्यान इंडोनेशियाने G20 चे अध्यक्षपद भारताकडे सोपवले. इंडोनेशियातील बाली येथे झालेल्या G20 परिषदेचे अध्यक्षपद आता भारताला मिळाले आहे. शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी इंडोनेशियाने G-20 चे अध्यक्षपद भारताकडे सुपूर्द केले.
G-20 शिखर परिषदेच्या समारोपीय सत्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जगाला G20 कडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि महिलांच्या सहभागाशिवाय जागतिक विकास शक्य नाही. यासोबतच अध्यक्षपद मिळाल्यानंतर मोदी म्हणाले की, ‘प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानाची बाब आहे. सर्व देशांच्या प्रयत्नांनी, आपण G20 शिखर परिषदेला जागतिक कल्याणाचा प्रमुख स्त्रोत बनवू शकतो.’ असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, ‘जगाला भौगोलिक-राजकीय तणाव, आर्थिक मंदी यांचा सामना करावा लागत असताना भारत G-20 ची जबाबदारी घेत आहे. अशा वेळी जग आशेच्या नजरेने G-20 कडे पाहत आहे. असे ते यावेळी म्हणाले. 1 डिसेंबरपासून भारत औपचारिकपणे G-20 चे अध्यक्षपद स्वीकारणार आहे.
G-20 मध्ये कोणते देश?
G-20 मध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनायटेड किंगडम, अमेरिका, आणि युरोपियन युनियन (EU) यांचा समावेश आहे. G20 ही जागतिक आर्थिक सहकार्याची प्रभावशाली संघटना आहे. हे जागतिक जीडीपीच्या सुमारे 85 टक्के, जागतिक व्यापाराच्या 75 टक्क्यांहून अधिक आणि जगाच्या सुमारे दोन तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करते.