भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीनं केली निवृत्तीची घोषणा; BCCI ने शेअर केली 'ही' खास पोस्ट
Sunil Chhetri Retirement : भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीनं निवृत्तीची घोषणा केली आहे. फिफा वर्ल्डकपच्या क्वालिफिकेशनसाठी भारत ६ जूनला कतारच्या संघाविरोधात सामना खेळणार आहे. हा सामना सुनील छेत्रीसाठी आंतराष्ट्रीय फुटबॉलमध्ये शेवटचा सामना असेल. त्यानंतर छेत्री इंडियन टीमच्या जर्सीत दिसणार नाही. सुनील छेत्रीच्या निव्वृत्तीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
"२००५ मध्ये भारतासाठी पदार्पण करणाऱ्या छेत्रीनं जवळपास दोन दशकांच्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये १५० सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्याने एकूण ९४ गोल केले आहेत. सर्वात जास्त गोल करणाऱ्या सक्रिय खेळाडूंच्या सूचीत छेत्री तिसऱ्या स्थानावर आहे. निवृत्तीची घोषणा केल्यानंतर छेत्रीनं प्रतिक्रिया देत म्हटलं, मी जेव्हा पहिला सामना खेळला होता, तो सामना आजही मला आठवतो. माझा पहिला सामना, माझा पहिला गोल, हा माझ्या प्रवासातील सर्वात अविस्मरणीय क्षण आहे.
मी देशासाठी इतके सामने खेळेल, असं मला कधीच वाटलं नव्हतं. मी निवृत्तीबाबत माझी आई,वडील आणि पत्नीला सर्वात आधी सांगितलं. जेव्हा याबाबत वडीलांना सांगितलं, तेव्हा त्यांनी सामान्य भावना व्यक्त केली. ते आनंदी होते. पण माझी आई आणि पत्नीला रडू कोसळलं. त्या ढसाढसा रडू लागल्या. मी थकलो होतो, असं मला वाटत नाही. पण हा माझा शेवटचा सामना असेल, याबाबत मी खूप विचार केला आहे, असं सुनील छेत्रीनं म्हटलं आहे.
BCCI ने सुनील छेत्रीच्या निवृत्तीवर दिली मोठी प्रतिक्रिया
"तुमचं करिअर खूप महान राहिलं आहे. भारतीय स्पोर्ट्स आणि भारतीय फुटबॉलसाठी तुम्ही आयकॉन राहिले आहात", असं बीसीसीआयने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे. सुनील छेत्रीचं भारतीय क्रिकेटशी खूप चांगलं कनेक्शन आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सुनील छेत्रीचा खूप चांगला मित्र आहे. विराटने अनेकदा सुनील छेत्रीचं कौतुक केलं आहे आणि भारतीय फुटबॉलला सपोर्ट करण्यासाठी आवाहन केलं आहे.