Independence Day : पंतप्रधान मोदींनी मांडली पुढील 25 वर्षांची ब्लू प्रिंट, घेतले 'हे' पाच संकल्प
नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात आज 75 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त मोदींना देशाला संबोधित करत असताना पाच संकल्प केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्याच्या इतक्या दशकांनंतर संपूर्ण जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. जगात हा बदल, जगाच्या विचारात झालेला हा बदल हा आपल्या 75 वर्षांच्या प्रवासाचा परिणाम आहे.
येत्या 25 वर्षांत आपल्याला आपली शक्ती, संकल्प आणि क्षमता पाच संकल्पांवर केंद्रीत करायची आहे. आपण निश्चित केलेली उद्दिष्टे गाठू. विकसित भारत, गुलामगिरीच्या कल्पनेतून स्वातंत्र्य, वारशाचा अभिमान, एकता आणि एकत्रता आणि नागरिकांची कर्तव्ये, असे हे पाच संकल्प आहेत.
विकसित भारत: स्वच्छता मोहिम, लसीकरण, 25 दशलक्ष लोकांना वीज जोडणी, उघड्यावर शौचापासून मुक्ती, अक्षय ऊर्जा या सर्व बाबींवर निश्चयाने पुढे जात आहोत.
गुलामगिरीच्या कल्पनेतून स्वातंत्र्य: गुलामगिरीच्या विचारसरणीतून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. आपल्याला कोणत्याही प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावे लागेल. देशातील प्रत्येक भाषेचा आपल्याला अभिमान असायला हवा. डिजिटल इंडिया आणि स्टार्टअप्स हे देशातील उदयोन्मुख विचार आणि शक्तीचे परिणाम आहेत.
वारशाचा अभिमान: जेव्हा आपण आपल्या मातीशी जोडले जाऊ, तेव्हाच आपण आकाशात उंच भरारी घेऊ. त्यामुळे वारशाचा अभिमान बाळगणे आवश्यक आहे. शेती आपल्या वारशाचा भाग आहे. संयुक्त कुटुंबही आपल्या वारशाचा भाग आहे. आपल्या परंपरेतच पर्यावरणाचे रक्षण लपलेले आहे.
एकता आणि एकत्रता: लैंगिक समानता, इंडिया फर्स्ट, कामगारांचा आदर हा विविधतेचा एक भाग आहे. स्त्रियांचा अपमान ही एक मोठी विकृती आहे, त्यातून मुक्तीचा मार्ग शोधावा लागेल.
नागरिकांचे कर्तव्य: नागरिकांचे कर्तव्य प्रगतीचा मार्ग तयार करते. हे मूळ चैतन्य आहे. विजेची बचत, शेतात उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर, रसायनमुक्त शेती, प्रत्येक क्षेत्रात नागरिकांची जबाबदारी आणि भूमिका असते, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, येत्या 25 वर्षांसाठी आपल्याला आपली शक्ती या पाच संकल्पांवर केंद्रीत करायचे आहे. 2047 ला स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होतील. तेव्हा स्वातंत्र्यप्रेमींची सर्व स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल. भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात, असा कोणताही काळ नाही जेव्हा देशवासीयांनी शेकडो वर्षे गुलामगिरीविरुद्ध लढा दिला नाही, आपले जीवन व्यतीत केले नाही, यातना सहन केल्या नाहीत, बलिदान दिले नाही. अशा प्रत्येक महापुरुषांच्या त्याग आणि बलिदानाला नतमस्तक होणे आज आपल्या सर्व देशवासीयांचे कर्तव्य आहे.
भारत लोकशाहीची जननी आहे. ज्यांच्या मनात लोकशाही आहे, ते निर्धाराने चालतात, तेव्हा ती शक्ती जगातील मोठ्या सुलतानांवर संकटाची वेळ आणते, असेही असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे.